Wednesday, July 30, 2008

कधी तरी असंच...........

कधी तरी असंच...........सुर्याची किरणे पुर्वे दिशेच्या समातंर व्हावीत... रस्त्यातून जाता जाता अंगणातील फुलझाडांना तोंड लावणाऱ्या शेळीची दोरी ओढून तीला मागे खेचत फाटक्‍या चपलांनी घराला माळावरच्या सखुनं जवळ करावं...... पोरांनी आईच्या हाकेला दाद न देता आपला गोट्यांचा खेळ तसाच सुरु ठेवावा, देवळातील पुजारी लांब काठीने चाफ्याची फुले पाडत असावा..... शेतातून गावाकडे येणाऱ्या पाणंदीत बायामाणसांची गर्दी असावी..... अशावेळी गावातील वडाच्या पारंब्याखाली शिळोप्यांच्या गप्पांना रंग चढतो.तंबाखूची पुडी बंडी (बनियान) च्या खिशातून काढून बघावी तर चुन्याचा पत्ता नसावा... चुना मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे गावचा पार. तंबाखूची तुंबडी भरुन गावच्या सरपंचापासून ते दिल्लीतल्या सरकारला अक्‍कल नाही म्हणणारी माणसं याच पारावर मिळतील. दिवसभर शेतात राबायचं आणि सांच्याला (सायंकाळी) पारावर जमायचं हा या लोकांचा दिनक्रम. बांधाला बांध असल्यानं फुटासाठी भांडणारी माणसं इथं जमत एकमेकांवर बोलत नसंतही पण त्यांना पाराशिवाय करमत नसे.....कुणाच्या म्हशीला कुठला रोग झालाय.... कुणाच्या बैलाला खांदा (शेतात काम केल्यावर बैलाचा खांदा सुजतो) आलाय.. याची खाणीसुमारी इथे मिळे... इथेच त्यावर कोणता उपाय करायचे हेही कळे तर काही उत्साही उपचार करण्यासाठी तातडीने जातही असंत.राजकारण हा इथला चवीचा विषय. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत सगळे उमेदवार इथल्या कोणाच्या ना कोणाच्या ओळखीतले यातील बहुतेकजण तरी केंद्रातील एखाद्याचा खास मर्जीतला. उजव्या हाताचा अंगठा डव्या हाताच्या तळव्यावरील तंबाखूवर चोळत अरे ते हे होय.... अशी प्रस्तावना करीत मंत्र्या संत्र्याच्या मर्जीत मी कसा आहे हे ठासून (खोटेच) सांगितले जात.... या खोटेपणातही खरे तर खरापणा होता. तो मंत्री कसा दिसतो हे त्यालाही माहित नाही हे पारावच्या साऱ्यांना ठावूक पण कोणीच विरोध करायचा नाही... एखादा त्यात खडूस असलाच तर उगाचच म्हणायचा.... बर मंत्रीसायबांचं सोड उद्या उसाला पाणी द्यायचं हाय न्हवं...... पण एवढंच.....पारावरनं धोतरं जावून चड्ड्या आल्या.... चडड्या जावून इजारी आल्या..... तिथं मात्र पार थोडा थांबला..... गावात नव्या पोरांनी इजार टाकून पॅंटीत पाय घातलं अन्‌ पार मात्र सुटला.... शिळोप्या गप्पांचे विषय बदलले आणि त्याही हळू हळू थांबल्या..... आज पारावरच्या वडाच्या पारंब्या या गप्पासाठी असुसलेल्या आहेत...........असंच कधीतरी पुन्हा हाईल