Friday, February 27, 2009

प्रवास उलट दिशेने

देवानं आपल्याला दिलेलं सुंदर वदरान म्हणजे आपलं जीवन. जीव आहे म्हणून या पृथ्वीचं सौदर्य आहे. सौंदर्य सजिवतेत असतं म्हणूनच आपण शिल्प असो वा चित्र किंवा एखादी कथा, कविता त्यात जिवंतपणा शोधतो आणि त्यातला जिवंतपणा आपल्याला दिसला नाही तर आपण त्याला कुरूपतेचे मापदंड लावतो. सौदर्य आणि सजिवतेचं अतुट नातं असतं. सजिव निर्जिव बनला की त्याचं सौदर्य लोप पावतं. त्याला कुरूपतेचा शाप मिळतो. पण सजिवाकडून निर्जीवाकडे जाणारा प्रवास एका संथ गतीत आणि निसर्गाच्या दिशेने जाणारा असेल तर पहिल्या जागी दुसरा सजिव जागा घेतो आणि तेथील सौदर्य अबाधित राहतं. पण हा प्रवास उलट दिशेने होत असेल तर......
गेल्या काही वर्षांतील निष्कर्ष तरी असेच निघू लागले आहेत. भौतिक सुखाच्या अतिरेकी लालसेपोटी छाती फुटेपर्यंत धावायचं आणि जर तरीही हाती काहीच गवसलं नाही तर छाती फोडून घ्यायची हा निसर्गाच्या नियमांना छेद देणारा नियम होवू लागला आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आत्महत्त्येचे प्रमाण कमालीचे वाढू लागले आहे. आत्महत्येत महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावरील राज्य बनले आहे. दूर तिकडे परदेशात म्हणता म्हणता हा आत्महत्येचा अजगर आता महाराष्ट्राच्या पोटावर बसून विक्राळ दात दाखवत आहे.
कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, परीक्षेत अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या, प्रेमात अपयश आले म्हणून तरूण तरुणींची आत्महत्या, बाह्य जगातील सुखे पदरात पडत नाहीत म्हणून निराशेने गृहीणींची आत्महत्या अशा असंख्य कारणांनी आत्महत्या होत आहेत. अगदी आई बोलली, बाबा रागावले अशा कारणांनी ज्या आत्महत्या होत आहेत त्याकडे बघीतलं की माणसांच्या जाणिवा इतक्‍या संवेदनशील बनल्याचं हे द्योतक मानायचं कि माणूस वरवर जरी प्रगतीची शिखरं गाठत असला तरी अंतर्गरित्या कोलमडत आहे आणि त्यातून त्याला सावरणारं आत्मिक बळ आता त्याच्यापासून दूर जावू लागलं आहे असं माणायचं काहीच कळत नाही. महाराष्ट्रात तरी या अजगराला रोखायला हवं ..........

स्वातंत्र्य

पक्ष्यांच्या किलबिलाटाचा, खळाळणाऱ्या पाण्याचा, बाळाच्या बोबड्या बोलाचा किंवा सुंदरीच्या पायातील नाजुक पैजणांपेक्षाही जगातील सर्वात मधुर आणि मंजूळ आवाज कुणाच्या तरी पायातील साखळ्या सुटण्याचा.... स्वातंत्र्याचा अर्थ तोच समजू शकतो जो पारतंत्र्यात राहीला आहे पण स्वतंत्रतून पारतंत्र्यात जावू पाहणाऱ्याबद्दल काय म्हणाल.... मंडळी जगातील सर्वात तरुणांची जास्त संख्या असलेल्या भारताला याबद्दल स्वतःचे कौतुक करायला हवे कि चिंता.... सध्याची परिस्थीती बघीतली तर चिंतेचे कारण बळावत चालल्याचे दिसत आहे. भारतातील तरुण आता तिशीतच साठीचे वाटू लागले आहेत. अनेक कारणांनी हे तरुण स्वतःचे स्वातंत्र्य गमावून अनेक विकारांचे गुलाम बनत आहेत. ऐन तारुण्यात ताणाचे गुलाम बनून वृद्धत्वाला जवळ करत आहेत. आणि त्यापासून लपण्यासाठी औषधांचे गुलाम बनत आहेत.
तिशीत उत्साहासाठी, नैसर्गीक क्षमता टिकण्यिासाठी तरुणांना औषधांचा आधार घ्यावा लागतो आहे ही बाब अगदीच क्‍लेषदायक आहे. ताण तणावांच्या आणि औषधांच्या बेड्या या तरुणांच्या पायातून ज्या दिवशी निखळून पडतील तेव्हाच स्वातंत्र्याचा सूर्य उत्साहाचे अर्ग्य स्वीकारेल..........

Tuesday, February 17, 2009

मोकळे व्हा.....

मोकळे व्हा.....



आभाळ भरुन यावं. ढगांची दाटी अगदी गच्च व्हावी. आता कोणत्याही क्षणी पावसाच्या धारा कोसळतील या आशेने मातीच्या कणनकणाने सावरुन घ्यावं. गवतांच्या पात्यांनी आपली मान उंचवावी. झाडांच्या पानांची सळसळ वाढावी. पावसाचे थेंब पडण्यापुर्वीच जनावरांची पाठ थरथरावी. विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट व्हावा. इतक्‍यात सोसाट्याचा वारा यावा. ढगांचा गडगडाट थंड पडावा. झाकोळलेले आकाश पुन्हा निर्मेघ व्हावं. पावसाच्या थेंबाच्या स्पर्शासाठी असुसलेले मातीचे कणांनी उसासा टाकावा आणि त्याचक्षणी दूर असलेल्या वाळवंटात जोराचा पाऊस पडून गेल्याचा निरोप गार वाऱ्याने घेऊन यावा....आणि गवताच्या पात्यांनी हळहळावे...भावनांची आसक्‍तीही अशीच असते की. कुणाला आपल्या खांद्यावर डोके ठेवावे वाटते, तर कुणाला हाताचा आश्‍वासक स्पर्शही सुखावून जातो, तर कुणाला सहज जाता जाता मारलेली हाकही पुरेशी ठरते. फक्‍त ती जाणून घ्यायची ताकद आपल्यात असायला हवी.
यांत्रीकतेच्या या जगात हळूहळू आपण आपल्याच भावना ओळखेनासे झालो आहोत. व्यवहारवादातून सारी कर्तव्ये आणि नाती सांभाळणं म्हणजे वाळवंटातील पावसासारखंच आहे. त्यामुळे हळहळणं हे नित्याचं होऊन बसलं आहे आणि जे नित्याचं होतं त्याची धार बोथटच आणि वेदनाही गोठूनच जातात.
घड्याळाच्या काट्याच्या तालावर नाचतानाही आपण कुणाचे तरी खूप काही आहोत आणि त्यांच्यासाठी आपल्या मनात खूप काही आहे हे त्याला जाणवून देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तुमच्या भावना व्यक्‍त होणं आवश्‍यक आहे. बऱ्याचवेळा त्यासाठी फोन हा उत्तम मार्ग असतो पण फोनवर आपल्याला जे सांगायचं आहे तेच बऱ्याचवेळा राहून जातं. त्यामुळे राई राईने जमा होणाऱ्या गैरसमजाचे डोंगरच्या डोंगर उभे राहातात. आणि त्याखाली दबून जातो. त्यासाठी हे गैरसमजाचे डोंगर उभेच न राहतील याची काळजी घेणं आवश्‍यक आहे. आणि त्यासाठी पत्र हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो.
गेल्या काही वर्षांपासून पत्राची शाळेत मार्कस मिळविण्यासाठीचा एक मार्ग किंवा प्रशासकीय कारभाराने अजुनी टिकवून ठेवलेला मागास प्रकार एवढीच ओळख बनून राहिली आहे.(मोबाईल फोनमुळे प्रेमपत्रे हा प्रकारही इतिहासजमा झाला आहे.) ही भावना झटकली पाहिजे. पत्रच असा एक प्रकार आहे ज्यातून तुम्हच्या भावना नीट पोहोचवू शकतो. पत्राच्या मायन्यातूनच तुम्ही त्यांच्या किती जवळ आहात हे दर्शवू शकता. तुम्हाला वाटणारा आदर, प्रेम तुम्ही निटपणे पत्रातून व्यक्‍त करु शकता. आई-बाबांना सांगता न येणाऱ्या काही गोष्टी, मित्रांत झालेला गैरसमज, प्राध्यपकांची वाटणारी भीती, आवडत्या कलाकाराबद्दल वाटणारी माया पत्रातून चांगल्याप्रकारे व्यक्‍त करता येते. कधी कधी आपण आपल्या जवळच्यांना तुमचे माझ्या आयुष्यात काय महत्त्व आहे हेच सांगायचे विसरतो. बायको-मुलांना तुम्ही नेहमी माझ्यासाठी खास आहात हे सांगणं कधी कधी आवश्‍यक असतं त्यावेळी लडखडताना तुम्हाला पत्राच्या काठीचा नक्‍की उपयोग होवू शकतो. शब्द तिथे तुमचे सखा बनतात आणि लेखनी तुमची सखी.. बघा एकदा प्रयोग करुन लेखनीतून झरणाऱ्या शब्दांसरशी तुम्ही मोकळे व्हाल.. आणि या मोकळेपणाचे भारलेपण खूप आनंद देईल!

Thursday, February 12, 2009

athavani घर करुन राहतात.

अजुनी आठवते मज
बोल तुझे ते बोबडे
गालफुगवूनी रुसून बसणे
अन्‌ हळूच नाक ओढणे

तोंडाचा चंबू करुनी
खाऊसाठी हटून बसणे,
बाबा येण्याआधी
दारापाठी लपून बसणे

अजुनी तुझ्या शाळेचे दप्तर
कपाटी माझ्या तसेच आहे...
तुझी पाटी भरलेली तरीही
माझ्या पाटीवर तुझेच नाव आहे.

अजुनी वाटते येशील तू
शाळेतून भूकेला
चटकन देशील ओ
माझ्या भाबड्या हाकेला...

Sunday, January 18, 2009

प्रति...

प्रति, सुप्रिया मॅडम,
गेल्या शुक्रवारी पुस्तक घेण्या-देण्याच्या निमित्ताने तुमची भेट झाली. खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होतीच, पण तसा योग येत नव्हता. तो यानिमित्ताने आला. भेटीपूर्वी तुमच्याबद्दल वाटणारा आदर भेटीनंतर दुप्पट-चौपट झाला. अनेकवेळा आपण एखाद्याचे लेखन वाचतो किंवा त्या लेखकाबद्दल इतरांनी सांगितलेल्या गोष्टीवरुन त्याची मनात एक प्रतिमा तयार करतो. याला मी पूर्वग्रह असं म्हणत नाही, पण अशा चौकटीत आपण लेखकाला ठेवतो. त्यामुळे आपल्यातील अस्वस्थता थोडी कमी होते. तशी एक प्रतिमा तुमच्याबद्दल माझ्या मानात होतीच. पण जेव्हा प्रत्यक्षात तुमच्याशी बोलणं झालं, त्यावेळी प्रत्यक्ष बऱ्याचवेळा प्रतिमेच्या खूपच उत्कट असंत हे माझ्यालेखी पुन्हा अधोरेखीत झालं.(याचं श्रेय मा. भोसलेसाहेबांना जाते.)
एक आठवड्यानंतर पत्र लिहण्याला एक कारण आहे ते म्हणजे तुमची पुस्तके. शुक्रवारी संध्याकाळी "पॉपकॉर्न' वाचायला घेतलं. पहिला लेख वाचल्यानंतर दुसरा आणि दुसऱ्यानंतर तिसरा लेख वाचण्याचा मोह आवरता आवरला नाही. बऱ्याचवेळा रात्री बेडवर पडल्यावर झोप येईपर्यंत पुस्तक नाकासमोर राहातं आणि त्यानंतर ते उलटं छातीवर कधी पडतं हे कळतच नाही..पण एखाद्या लहान मुलापुढे खाऊचा डबा ठेवला तर ते मूल किती हरखून जाईल तेवढाच हरखून गेलो. घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देत आता हा शेवटचाच लेख वाचायचा आणि झोपायचा असा विचारही केला. लाईट बंद केली पण तरी एक अस्वस्थता कायम राहीली आणि पुन्हा लाईट लावला पुस्तक पूर्ण केलं मगच शांत झोप आली. विशेष म्हणजे मला आता जेव्हा जेव्हा खूप अस्वस्थ वाटेल आणि रिलॅक्‍स होण्यासाठी एक लेख सकाळी आणि एक लेख रात्री वाचण्याचा डोस पुरेल हे नक्‍की!
"टाईमपास' मात्र पाच- सहा वर्षांपुर्वी माझ्या वाचनात आलं नाही हे बरे झाले. बऱ्याचवेळेला शब्दांचा समोरचा अर्थ दिसतो तसा असतोच असं नाही. किंवा एखाद्या वाक्‍याचाही अर्थ असाच संदर्भहीन आला तर त्याच्या छटा वेगळ्याच दिसतात. किमान मला तरी समुहातील शब्द आणि समुहाबाहेरचा शब्द वेगवेगळा भासतो. पुस्तकांत येणारा शब्द हा रिलेतील खेळाडूसारखा असतो अगदी आपल्या हातातील काठी पुढच्या खेळाडूच्या हातात देणारा, तर एकटा शब्द धावण्याच्या स्पर्धेत एकटा धावत असल्यासारखा. त्यामुळे शब्दांचे समोरचेच अर्थ घेण्याच्या वयात मला हे पुस्तक कदाचित आवडलं नसतं. पण आज मात्र हे पुस्तक वाचताना जगण्यातली शुचिर्भूतता ही कल्पनेतच असते पण जसं जगलो तसं मांडणं याला किती धीटपणा असावा लागतो याची जाणीव आहे. त्यामुळे हे पुस्तक डोक्‍यात कमी जातं आणि मनात घर करुन बसतं. प्रोतिमांचं जगणं जितकं प्रवाही आहे, त्याहीपेक्षा तुम्ही केलेलं त्याचं भाषांतर. या प्रवाहात एकदा माणूस पडला की पुन्हा किनाऱ्याचा शोध तो घेत नाही अगदी शेवटापर्यंतच तो येवून पोहोचतो. यासाठी तुम्हाला धन्यवाद!

ता.क. काही व्याकरणाच्या चुका असतील तर क्षमा! मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.