Tuesday, February 17, 2009

मोकळे व्हा.....

मोकळे व्हा.....



आभाळ भरुन यावं. ढगांची दाटी अगदी गच्च व्हावी. आता कोणत्याही क्षणी पावसाच्या धारा कोसळतील या आशेने मातीच्या कणनकणाने सावरुन घ्यावं. गवतांच्या पात्यांनी आपली मान उंचवावी. झाडांच्या पानांची सळसळ वाढावी. पावसाचे थेंब पडण्यापुर्वीच जनावरांची पाठ थरथरावी. विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट व्हावा. इतक्‍यात सोसाट्याचा वारा यावा. ढगांचा गडगडाट थंड पडावा. झाकोळलेले आकाश पुन्हा निर्मेघ व्हावं. पावसाच्या थेंबाच्या स्पर्शासाठी असुसलेले मातीचे कणांनी उसासा टाकावा आणि त्याचक्षणी दूर असलेल्या वाळवंटात जोराचा पाऊस पडून गेल्याचा निरोप गार वाऱ्याने घेऊन यावा....आणि गवताच्या पात्यांनी हळहळावे...भावनांची आसक्‍तीही अशीच असते की. कुणाला आपल्या खांद्यावर डोके ठेवावे वाटते, तर कुणाला हाताचा आश्‍वासक स्पर्शही सुखावून जातो, तर कुणाला सहज जाता जाता मारलेली हाकही पुरेशी ठरते. फक्‍त ती जाणून घ्यायची ताकद आपल्यात असायला हवी.
यांत्रीकतेच्या या जगात हळूहळू आपण आपल्याच भावना ओळखेनासे झालो आहोत. व्यवहारवादातून सारी कर्तव्ये आणि नाती सांभाळणं म्हणजे वाळवंटातील पावसासारखंच आहे. त्यामुळे हळहळणं हे नित्याचं होऊन बसलं आहे आणि जे नित्याचं होतं त्याची धार बोथटच आणि वेदनाही गोठूनच जातात.
घड्याळाच्या काट्याच्या तालावर नाचतानाही आपण कुणाचे तरी खूप काही आहोत आणि त्यांच्यासाठी आपल्या मनात खूप काही आहे हे त्याला जाणवून देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तुमच्या भावना व्यक्‍त होणं आवश्‍यक आहे. बऱ्याचवेळा त्यासाठी फोन हा उत्तम मार्ग असतो पण फोनवर आपल्याला जे सांगायचं आहे तेच बऱ्याचवेळा राहून जातं. त्यामुळे राई राईने जमा होणाऱ्या गैरसमजाचे डोंगरच्या डोंगर उभे राहातात. आणि त्याखाली दबून जातो. त्यासाठी हे गैरसमजाचे डोंगर उभेच न राहतील याची काळजी घेणं आवश्‍यक आहे. आणि त्यासाठी पत्र हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो.
गेल्या काही वर्षांपासून पत्राची शाळेत मार्कस मिळविण्यासाठीचा एक मार्ग किंवा प्रशासकीय कारभाराने अजुनी टिकवून ठेवलेला मागास प्रकार एवढीच ओळख बनून राहिली आहे.(मोबाईल फोनमुळे प्रेमपत्रे हा प्रकारही इतिहासजमा झाला आहे.) ही भावना झटकली पाहिजे. पत्रच असा एक प्रकार आहे ज्यातून तुम्हच्या भावना नीट पोहोचवू शकतो. पत्राच्या मायन्यातूनच तुम्ही त्यांच्या किती जवळ आहात हे दर्शवू शकता. तुम्हाला वाटणारा आदर, प्रेम तुम्ही निटपणे पत्रातून व्यक्‍त करु शकता. आई-बाबांना सांगता न येणाऱ्या काही गोष्टी, मित्रांत झालेला गैरसमज, प्राध्यपकांची वाटणारी भीती, आवडत्या कलाकाराबद्दल वाटणारी माया पत्रातून चांगल्याप्रकारे व्यक्‍त करता येते. कधी कधी आपण आपल्या जवळच्यांना तुमचे माझ्या आयुष्यात काय महत्त्व आहे हेच सांगायचे विसरतो. बायको-मुलांना तुम्ही नेहमी माझ्यासाठी खास आहात हे सांगणं कधी कधी आवश्‍यक असतं त्यावेळी लडखडताना तुम्हाला पत्राच्या काठीचा नक्‍की उपयोग होवू शकतो. शब्द तिथे तुमचे सखा बनतात आणि लेखनी तुमची सखी.. बघा एकदा प्रयोग करुन लेखनीतून झरणाऱ्या शब्दांसरशी तुम्ही मोकळे व्हाल.. आणि या मोकळेपणाचे भारलेपण खूप आनंद देईल!

1 comment:

BinaryBandya™ said...

पाऊस पडून गेल्याचा निरोप गार वाऱ्याने घेऊन यावा....आणि गवताच्या पात्यांनी हळहळावे...भावनांची आसक्‍तीही अशीच असते



faar chhan